पुणे प्रतिनिधी : पूर्व पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच नागरिकांना नियमित आणि समतोल पाणीपुरवठा मिळावा यासाठी राज्य सरकारने मोठा पाऊल उचलले आहे. मुंढवा येथील महात्मा फुले चौकातील दुमजली उड्डाणपूल व मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच महंमदवाडी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नऊ पाणीसाठवण टाक्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, चेतन तुपे, महापौर मंजुषा नागपुरे, सभागृहनेते गणेश बिडकर पालिका आयुक्त नवल किशोर राम, नगरसेवक निवृत्ती बांदल, अतुल तरवडे, श्वेता घुले, प्राची आल्हाट, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “पुणे शहर झपाट्याने विस्तारत आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन सरकारने पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला आहे. मुंढवा येथील दुमजली उड्डाणपुलामुळे नागरिकांचा किमान २० मिनिटांचा प्रवास वेळ वाचेल आणि पूर्व पुण्यातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत मिळेल. महंमदवाडी समान पाणीपुरवठा योजनेमुळे प्रभाग क्रमांक ४१ आणि १९ मधील नागरिकांना नियमित, समतोल आणि दाबाने पाणी मिळणार आहे. पुण्याच्या विकासाला दुहेरी गती देण्याचे काम राज्य सरकार करत आहे,” असे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार म्हणाल्या, “पुण्याचा विकास करताना केवळ मोठे प्रकल्प उभारणे पुरेसे नाही, तर त्या कामांची गुणवत्ता आणि दर्जाही सर्वोत्तम असला पाहिजे, यावर आमचा भर आहे. दादांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील प्रत्येक विकासकाम पारदर्शक आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांच्या दैनंदिन समस्या वेळेत सोडविण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवला जात आहे. पाणी, रस्ते आणि वाहतूक या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार योगेश टिळेकर यांनी मुंढवा परिसरातील वाढत्या वाहतूक समस्येची माहिती देत दुमजली उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्पामुळे पूर्व पुण्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येवले वाडी ते कात्रज आणि एनआयबीएम रोड कोंढवा, वानवडी स्वारगेट अशी मेट्रो मार्गिका साठी मंजुरी देण्यात आली आहे . महंमदवाडी जलयोजनेमुळे नागरिकांची अनेक वर्षांची पाण्याची समस्या मार्गी लागणार असल्याचेही प्रास्ताविकातत्यांनी सांगितले.






