लेखक: रवींद्र मधुकर पांचाळ*
आज जगभरात फिफा वर्ल्ड कपचा फिव्हर जोमात आहे. *केरळ, बंगाल, गोवा, मणिपूर, ओडिसा* तर सोडाच, पण *उत्तर प्रदेश आणि बिहार* सारखी राज्ये जिथे कधीकाळी फुटबॉल माहितही नव्हता, तिथेही आज सरकार फुटबॉल जपत आहे.
*महाराष्ट्रात मात्र कोल्हापूर एकमेव अपवाद आहे.* *छत्रपती शाहू महाराज स्टेडियमच्या माध्यमातून तिथे फुटबॉल खऱ्या अर्थाने जोपासला जात आहे.* *महाराष्ट्रात सर्वाधिक प्रेक्षकवर्ग फुटबॉलसाठी कोल्हापूरलाच लाभतो.* याचे श्रेय तेथील *राजकीय नेत्यांना आणि राजेशाही घराण्यातील सध्याच्या नेतृत्वाला* द्यावे लागेल.
पण *महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मात्र फुटबॉलसाठी एकही ‘ओपन टू ऑल’ मैदान उपलब्ध नाही.* मुंबईत *99% मैदाने क्रिकेटसाठी आरक्षित* आहेत. *‘टर्फ’च्या नावाखाली लूट सुरू आहे.* एका संपूर्ण फुटबॉल मैदानाचे 8 तुकडे करून *तासाला ₹3,000, म्हणजेच तासाला ₹24,000 ची वसुली* केली जाते. झोपडपट्टीतला मुलगा रोज ₹200-₹300 भरून कुठून खेळणार?
*माजी मंत्री सुनील केदार* यांनी *हायकोर्ट समोरील ओव्हल मैदानातील दोन क्रिकेट विकेट काढून फुटबॉलसाठी मैदान आरक्षित* करण्याचा निर्णय घेतला होता. पण तो रद्द झाला.
याच पार्श्वभूमीवर *माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माननीय क्रीडामंत्री यांचे मनापासून आभार मानावे लागतील की त्यांनी एक विजन डोळ्यासमोर ठेवून ‘प्रोजेक्ट महादेवा’सारखा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्याची तयारी दाखवली.* *क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको व WIFA* यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू झाला. *वानखेडेवर मेस्सीने 40 मुलांसोबत फुटबॉल खेळला.* नेरुळला *419 खेळाडूंची निवड चाचणी* झाली, त्यातील *20 मुले व 20 मुलींची* निवड झाली.
पण हा विरोधाभास पहा: *419 पैकी फक्त 40 मुलांना मेस्सीसोबत संधी, बाकी लाखो मुलांना रोज खेळायला मैदानच नाही.* *‘प्रोजेक्ट महादेवा’चे विजन पूर्णत्वास न्यायचे असेल तर सरकारने तातडीने पावले उचलावीत:*
1. *टर्फ माफियांकडून मैदाने ताब्यात घ्या.*
2. *ओव्हल मैदानाबाबतचा सुनील केदार यांचा निर्णय लागू करा.*
3. *प्रत्येक वॉर्डात शक्य नसेल तर किमान एका तालुक्यात/विधानसभा क्षेत्रात एक मैदान फुटबॉलसाठी मोफत आरक्षित करा.*
4. *कोल्हापूरच्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात फुटबॉलला प्रोत्साहन द्या* व *क्रिकेटप्रमाणेच शासकीय नोकरीत आरक्षण द्या.*
उत्तर प्रदेश-बिहार पुढे जात आहेत, *कोल्हापूरने मार्ग दाखवला आहे.* *मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या विजनला मैदानांची जोड मिळाली तर ‘प्रोजेक्ट महादेवा’ खऱ्या अर्थाने यशस्वी होईल.* प्रतिभेची कमतरता नाही, कमतरता आहे फक्त मैदानाची.





