मुंबई प्रतिनिधी : स्थानिय लोकाधिकार सेना महासंघाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा नुकताच मुंबईतील मरीन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात जल्लोषात पार पडला. बेरोजगार भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधींमध्ये प्राधान्य मिळावे, स्थानिक युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण उपलब्ध व्हावे आणि असुरक्षित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय्य हक्क व संरक्षण मिळावे, या उद्देशाने महासंघाच्या वतीने रोजगार, कामगार हक्क आणि उद्योग समन्वयाशी संबंधित विविध विषयांवर भर देण्यात आला.
महासंघाच्या संकल्पनेनुसार कौशल्य विकास केंद्रांची स्थापना, उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षण, स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेला प्रोत्साहन या माध्यमातून सक्षम व समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कामगारांच्या प्रश्नांवरही महासंघाने आपली भूमिका स्पष्ट केली. कंत्राटी कामगारांची नियुक्ती करताना आवश्यक परवाने व कायदेशीर तरतुदींचे पालन, समान कामासाठी समान वेतन व लागू लाभ, निश्चित मुदतीवरील कर्मचाऱ्यांचे हक्क तसेच आरोग्यविमा आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या विषयांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, औद्योगिक क्षेत्रात स्थानिक कौशल्याला प्राधान्य मिळवून देणे, कंत्राटी व असंघटित कामगारांचे हक्क जपणे आणि युवकांना स्वावलंबनाकडे नेणे या उद्दिष्टांसाठी महासंघाचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. “बेरोजगार भूमिपुत्रांना नोकरीचा अधिकार आणि असुरक्षित व असंघटित नोकरदारांना संरक्षण” हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी महासंघ यापुढेही विविध उपक्रम राबविणार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले.
गजानन कीर्तिकर यांच्या अनुभवातून आणि संकल्पनेतुन व प्रसिद्धी प्रमुख आशिष देसाई यांच्या कल्पकतेतुन साकरलेले स्थानिय लोकाधिकार सेना महासंघाचे धोरण व कार्यपद्धतीवर आधारित पुस्तिकेचे अनावरण व वितरण करण्यात आले. यात विशेष सहकार्य क़ायदा माहिती संकलन अॅड. सुहास सावंत यांचे होते. कार्यक्रमा दरम्यान नवनिर्वाचीत लोकाधिकार सेनेच्या अध्यक्ष म्हणून श्रीमती गोमती पाचभाई (अध्यक्ष -चंद्रपुर व गडचिरोली) आणि श्री राजाभाऊ रामद्वार (अध्यक्ष – नागपूर व वर्धा) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक हांडे दिग्दर्शित ‘मराठी बाणा’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे व विशेष अतिथी म्हणून शिवसेना नेते आनंदाराव अडसूळ, महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत, महाराष्ट्राचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना. भरतशेठ गोगावले, माजी खासदार व शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना सचिव संजय मोरे उपस्थित होते. तसेच स्थानिय लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे कार्याध्यक्ष तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सरचिटणीस अरुण मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा संपन्न झाला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी खजिनदार संतोष बामणे, उपाध्यक्ष शिवप्रसाद भामरे, देवा कदम, राजेंद्र मडगावकर, रवी विचारे, दीपक काळिंगण, संदीपकुमार कदम, चिटणीस सुप्रिया करंडे, विजय परब, सचिन कदम, निलेश बुरणकर, करण ठाकूर, मंगेश धामणकर, आशिष देसाई यांनी मेहनत घेतली तसेच गजानन कीर्तिकर यांचे सहायक संदीप कानसे, मनीषा राणे यांचा कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष सहभाग होता.





