राणीबागेत ज्येष्ठ नागरिकांची प्रभातफेरी बंद, नागरिकांनी केला निषेध
मुंबई प्रतिनिधी : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबाग येथे ज्येष्ठ नागरिकांना सकाळी प्रभातफेरी करण्यास मज्जाव करण्यात आल्याने ज्येष्ठांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
या संदर्भात राणीबाग प्रभातफेरी समूहाचे श्री. अशोक भेके आणि मनसे नेते श्री. संजय नाईक, समाजसेवक श्री दिनेश कोलते यांनी उद्यान अधीक्षक श्री. त्रिपाठी यांची भेट घेऊन प्रभातफेरी पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. मात्र ज्येष्ठ नागरिकांप्रती उदासीनता दाखवत त्यांनी ही विनंती फेटाळली. “ज्येष्ठांचा दबाव वाढत आहे” हे कारण देत ते प्रभातफेरी सुरू करण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचा आरोप श्री. भेके यांनी केला.
विशेष म्हणजे चौकशी केली असता प्रभातफेरी बंद करण्याचे कोणतेही लेखी आदेश वरून आले नसल्याचे समजते. बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मुद्यावर उद्यान परिसरात आंदोलन केले होते. त्यानंतर त्रिपाठी यांनी चिडून प्रभातफेरी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
या विरोधात राणीबाग प्रभातफेरी समूहाच्या वतीने श्री. अशोक भेके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री _श्री. देवेंद्र फडणवीस_ आणि मुंबईच्या महापौर _सौ. ऋतु तावडे_ यांना निवेदन सादर केले आहे.
केंद्र सरकारच्या “आझादी का अमृत महोत्सव” आणि “फिट इंडिया” या अभियानाला हरताळ फासण्याचे काम येथे होत आहे, अशी खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.
जर त्वरित प्रभातफेरी सुरू न केल्यास ज्येष्ठ नागरिक तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देखील भेके यांनी दिला आहे.




