मुंबई प्रतिनिधी
श्रीलंका संसदेत खासदार म्हणून निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या निला विखे पाटील यांनी महाराष्ट्राचे मंत्री आणि आपले चुलते राधाकृष्ण विखे पाटील तसेच चुलत भाऊ सुजय विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “गेल्या दशकभरात ज्यांच्याशी माझा कोणताही संबंध राहिलेला नाही, ते आज माझ्या राजकीय यशाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशा शब्दांत निला यांनी PTI ला आपली प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भातील वृत्त ‘द ट्रिब्यून’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
निला विखे पाटील या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत. १३ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या स्वीडनच्या राष्ट्रीय निवडणुकीत त्या स्टॉकहोम शहर मतदारसंघातून ३४९ सदस्यांच्या संसदेवर निवडून आल्या आहेत. त्या स्वीडनच्या ‘ग्रीन पार्टी’च्या प्रमुख नेत्या मानल्या जातात.
आपल्या राजकीय यशावर भाष्य करताना निला यांनी PTI वृत्तसंस्थेशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “कोणीतरी मला एक व्हिडिओ पाठवला, ज्यामध्ये सुजय विखे पाटील सांगताना दिसत आहेत की, ‘महाराष्ट्रात भलेही विखे पाटलांचा खासदार पराभूत झाला असला, तरी कुटुंबाने स्वीडनमध्ये आपला खासदार निवडून आणला आहे.’ हे ऐकून मला अत्यंत आश्चर्य वाटले.”
गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळात माझा काका किंवा चुलत भावाशी कोणताही संपर्क आलेला नाही. मी नियमितपणे भारतात येत असते, पण आता मी खासदार झाल्यानंतर ते माझ्या यशाच्या आधारे स्वतःचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा दावा निला यांनी केला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते निलेश लंके यांनी पराभव केला होता. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी निला यांच्या निवडून येण्याचा संदर्भ देत वक्तव्य केले होते.
४१ वर्षीय निला यांनी विखे पाटील कुटुंबाच्या बदलत्या राजकीय भूमिकेवरही टिप्पणी केली. “त्यांचे राजकारण आणि माझे राजकारण पूर्णपणे वेगळे आहे. मी माझा पक्ष कधीही बदलणार नाही, पण त्यांनी मात्र पक्ष बदलले आहेत.”
२०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये काम केले आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी कॅबिनेट मंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदही भूषवले होते.
निला पुढे म्हणाल्या, “माझ्या विजयानंतर काकांनी मला फोन करून अभिनंदन केले, ही त्यांची सौजन्याची भूमिका होती. पण त्या पलीकडे गेल्या १० वर्षांत आमच्यात कोणताही संवाद झालेला नाही.”





