मुंबई प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर 2026 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मधील रंगस्वर सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आणि परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष शिवराज काटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.. यावेळी जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे..
पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी परिषदेच्यावतीने पत्रकारितेत भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांचा विविध पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान केला जातो..
यावर्षी बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना जाहीर झाला आहे.. 25 हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे..
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कदम यांना आचार्य अत्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहे.. सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कार जान्हवी मुळे यांना दिला जाणार आहे.. हिंदी पत्रकारितेचे भिष्माचार्य बाबुराव पराडकर यांच्या नावाने यावर्षी पासून पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.. तो वरिष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी यांना दिला जाणार आहे..
विविध मान्यवरांनी परिषदेकडे ठेवलेल्या रक्कमेतून खालील पुरस्कार दिले जातात..
दत्ताजीराव तटकरे स्मृती पत्रकारिता पुरस्कार इटीव्हीचे मराठीचे संपादक सचिन परब यांना दिला जातोय.. स्वातंत्र्यसेनानी मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संतोष आंधळे यांना, स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख देवडीकर कृषी पत्रकारिता पुरस्कार कोल्हापूर सकाळचे सुनील पाटील यांना, ज्येष्ठ पत्रकार भगवंतराव इंगळे स्मृती पत्रकारिता पुरस्कार नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश महालक्ष्मे यांना तर
नागोजीराव उर्फ आण्णासाहेब दुधगावकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांना दिला जातोय.. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भागवत स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार गडचिरोलीचे न्यूज 18 लोकमतचे पत्रकार महेश तिवारी यांना आणि संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार सातारा येथील ग्रामोध्दारचे संपादक बापुसाहेब जाधव यांना दिला जाणार आहे..
17 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी मोठय़ा संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन अध्यक्ष शिवराज काटकर, विश्वस्त शरद पाबळे, विश्वस्त किरण नाईक, मुंबई शाखेचे अध्यक्ष राजा आदाटे, मुंबई अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष दीपक कैतके, डिजिटल मिडिया परिषदेचे अनिल वाघमारे,, मुंबईचे अध्यक्ष मनोज भोईर परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, माजी सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर आदिंनी केले आहे..





