Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयनं सुनेत्रा पवार यांच्यासाठी पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई – बारामती पोटनिवडणुकीत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २.१४ मतांनी विजय मिळवला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. पण, २२ उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे मतदान प्रक्रिया पार पडली आणि सुनेत्रा पवार विजयी झाल्या. अशातच आता सुनेत्रा पवार यांच्या विजयावर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयनं खास पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर या पोस्टच्या शेवटी अभिनेत्यानं मराठीमध्ये एक ओळसुद्धा लिहिली आहे. विवेक ओबेरॉयची पोस्ट विवेक ओबेरॉयनं इन्स्टाग्रामवर सुनेत्रा पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, ‘सुनेत्रा वहिनी, अजित दादांचं अस्तित्व, त्यांचं नाव, त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक बारामतीकरांच्या मनात कायम राहणार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत तुम्ही जो ऐतिहासिक विजय नोंदवला आहे, ही एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. दादांनी राबवलेले विविध उपक्रम, त्यांचं सामान्य लोकांवर असलेलं प्रेम आणि त्यांची जिद्द यामुळेच ते खरे ‘लोकनेते’ म्हणून ओळखले जात होते आणि आज त्यांच्या अर्धांगिनीवर जनतेनं दाखवलेला विश्वास हेच सिद्ध करतो की, त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी तुम्हीच योग्य वारसदार आहात.’ महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ ‘तुम्हाला या नव्या प्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! महाराष्ट्रासाठी हा नक्कीच सुवर्णकाळ ठरेल…कारण, ‘सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो!’ असं विवेकनं शेवटी म्हटलं आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणुकीच्या निकालात २ लाख १८ हजार ९३० मतं मिळाली असून त्यांचा हा विजय ऐतिहासिक आहे. या ऐतिहासिक विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी मतदारांचे आभार मानले. सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजित पवार यांच्या निधनानंतरची ही माझी पहिलीच निवडणूक आहे. मला ही निवडणूक लढवावी लागेल, अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. बारामतीच्या जनतेचं प्रेम आणि मतं ही अजित दादांना खरी आदरांजली आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानते.’ सुनेत्रा पुढे म्हणाल्या, ‘बारामती हे माझं कुटुंब आहे. शरद पवार यांच्यासह मला मिळालेला पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी जनतेसाठी काम करत राहीन आणि विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहीन.’
Tamil Nadu Politics: तमिळनाडूत थलपती सरकार! राज्यपालांकडून ग्रीन सिग्नल; सस्पेन्स संपला, शपथविधीचा मुहूर्त ठरला
Tamil Nadu Politics: तमिळनाडूतील सत्ता स्थापनेचा पेच अखेर पाच दिवसांनी सुटला आहे. टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यांदा दावा राज्यपालांनी मान्य केला. विजय यांचा शपथविधी सोहळा उद्या संपन्न होईल. चेन्नई: तमिळनाडूत थलपती विजय यांच्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. अभिनेते ते नेते असा प्रवास करणाऱ्या विजय यांनी शनिवारी राजभवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. टीव्हीके पक्षाचे प्रमुख असलेल्या विजय यांनी राज्यपालांच्या भेटीत सत्ता स्थापनेचा दावा केला. विजय यांनी याआधी तीनवेळा राज्यपालांची भेट घेतली होती. अखेर चौथ्या भेटीत बहुमताचा पेच सुटला आहे. विजय उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजय सातत्यानं राज्यपालांच्या भेटी घेत होते. पण त्यांना सत्ता स्थापनेचं आमंत्रण मिळालं नव्हतं. अखेर शनिवारी विजय सरकारचा मार्ग मोकळा झाला. यानंतर विजय राज्यपालांच्या भेटीला पोहोचले. विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकत विजय यांचा टीव्हीके राज्यातील सर्वात मोटा पक्ष ठरला. पण बहुमताच्या आकड्यापासून ते दूर राहिले. तमिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी ११८ आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. टीव्हीकेनं १०८ जागा जिंकल्या. पक्षप्रमुख विजय २ मतदारसंघांतून विजयी झाले. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या विजय यांच्या पक्षाचे १०७ आमदार आहेत. यामुळे बहुमतासाठी आणखी ११ आमदारांचा पाठिंबा गरजेचा होता. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी विजय यांना पाठिंबा दिला. या पक्षांचं एकत्रित संख्याबळ ९ इतकं आहे. यामुळे टीव्हीकेकडे ११६ आमदारांचं बळ होतं. त्यांना आणखी २ आमदारांचा पाठिंबा गरजेचा होता. व्हीसीके पक्षानं शनिवारी संध्याकाळी त्यांची भूमिका जाहीर झाली. पक्षानं विजय यांना पाठिंबा जाहीर केला. व्हीसीकेचे २ आमदार आहेत. व्हीसीकेच्या पाठिंबा पत्रानं गेम फिरला आणि विजय यांनी बहुमताचा आकडा गाठला. यानंतर आययूएमएलनंदेखील विजय यांना समर्थन दिलं. त्यांचे २ आमदार आहेत. यामुळे विजय यांच्या समर्थक आमदारांचा आकडा १२० वर गेला आणि सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढत असलेल्या विजय यांच्या पक्षानं प्रस्थापित पक्षांना धक्का देत तब्बल १०८ जागा जिंकल्या. पण बहुमतापासून त्यांचा पक्ष दूर राहिला. अखेर काँग्रेस आणि अन्य लहान पक्षांच्या साथीनं विजय यांनी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यांची जुळवाजुळव केली. अखेर पाच दिवसांनी तमिळनाडूतील सत्ता पेच संपुष्टात आला आहे.
Supriya Sule Car Accident : खासदार सुप्रिया सुळेंच्या कारचा अपघात, भरधाव वाहनाची धडक; गुजरात पासिंगचं वाहन
Supriya Sule Car Accident : राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या नेत्या तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा पुणे ते मुंबई प्रवासादरम्यान भीषण अपघात झाला. आज महामार्गावरून जात असताना एक वाहनचालक बेदरकार वाहन चालवत असल्याने त्याने सुप्रिया सुळे यांच्या गाडीला धडक दिली. सुदैवाने यात काही दुर्दैवी घडलेलं नाहीय. सुप्रिया सुळेंची पोस्ट करत माहिती याबाबत सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे. सुळे यांनी संबंधित गाडी चालकाचा नंबर देखील शेअर केला आहे. ‘जीजे 13 सीएफ 5257 या क्रमांकाच्या वाहनाने निष्काळजीपणे आणि वेगात वाहन चालवत बाजूने धडक दिल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वजण सुरक्षित बचावले. सीट बेल्ट घातल्यामुळे मी बचावले असल्याचं’, सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.