केतन खेडेकर
प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पूर्व ऑनलाईन नोंदणीची लिंक पोलीस सुरू करावी अशी मागणी शिवसेनेचे सचिव वैभव थोरात यांनी केली आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे निकाल आता जाहीर होऊ लागले आहेत. या परीक्षांमध्ये अपेक्षित गुण न मिळालेले विद्यार्थी हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळाले आहेत. ते अभियांत्रिकी, नर्सिंग, एमबीए, एमएमस, बीएमए या अभ्यासक्रमांना सीईटीमार्फत प्रवेश घेण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेश रद्द करतात. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त राहत आहेत. मुंबई विद्यापीठाने प्रवेश पूर्व ऑनलाईन नोंदणीसाठीची लिंक ही ११ जून रोजी बंद केली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी नोंदणी करणे शक्य होत नाही. मुंबई व आसपासच्या परिसरातील अनेक महाविद्यालयांकडे शेकडो विद्यार्थ्यांकडून मागील काही दिवसांमध्ये विचारणा झाली आहे. मात्र प्रवेश पूर्व ऑनलाईन नोंदणी लिंक बंद असल्याने महाविद्यालयांकडून हतबलता व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे नवीन प्रवेश बंद तर दुसरीकडे प्रवेश कमी झाल्याने जागा रिक्त राहत आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होऊन त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.
तरी मुंबई विद्यापीठाने या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा गांभीर्याने विचार करून लगेच लिंक खुली करून विद्यार्थ्यांना शेवटची संधी देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे सचिव वैभव थोरात यांनी मुंबई विद्यापीठाला निवेदन देऊन केली.





