मुंबई प्रतिनिधी : १०० टक्के शारीरिक दिव्यांग आणि अखिल भारतीय पिकलबॉल असोसिएशन तसेच एशियन पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू यांच्या व्हीलचेअरचा महत्त्वाचा भाग विमान प्रवासादरम्यान गहाळ झाल्याचा आरोप समोर आला आहे. कोचीहून मुंबईला परतल्यानंतर मुंबई विमानतळावर हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर समस्या सोडविण्यासाठी आपल्याला दोन तासांहून अधिक काळ विमानतळावर थांबावे लागल्याचा आरोप प्रभू यांनी केला आहे.
प्रभू हे १०व्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेसाठी कोची येथे गेले होते. ५ ऑक्टोबर रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX1800 विमानाने ते सहाय्यकासह मुंबईला परतत होते. मुंबईत पोहोचल्यानंतर व्हीलचेअरचा एक महत्त्वाचा भाग गायब असल्याचे आढळले. याप्रकरणी एअर इंडिया एक्स्प्रेसकडे तक्रार करण्यात आली असून, कंपनीने Property Irregularity Form (PIR) जारी केल्याचे प्रभू यांनी सांगितले.
“मी माझ्या व्हीलचेअरवर पूर्णपणे अवलंबून आहे; मग विमान कंपनी इतकी निष्काळजी कशी?” असा सवाल त्यांनी केला आहे.
व्हीलचेअर ही दिव्यांग व्यक्तीसाठी सामान्य सामान नसून स्वावलंबन आणि सुरक्षित हालचालींसाठी अत्यावश्यक साधन असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले. मुंबई विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून तसेच CISFकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचाही त्यांचा आरोप आहे.
या प्रकरणाची नागरी विमान वाहतूक मंत्रालय, DGCA, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि संबंधित विमानतळ प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी प्रभू यांनी केली आहे. गहाळ भाग तातडीने शोधून परत करावा, व्हीलचेअरच्या हाताळणीबाबत लेखी स्पष्टीकरण द्यावे आणि झालेल्या त्रासाची नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.
“दिव्यांग प्रवाशाला सुविधा देणे ही कृपा नाही, ती जबाबदारी आहे. व्हीलचेअर हे सामान्य सामान नाही; ती दिव्यांग व्यक्तीच्या स्वावलंबनाची गरज आहे,” असे प्रभू यांनी ठामपणे सांगितले.






