मुंबई ता 26 – धर्म आणि धार्मिक उत्सव हे घरापुरतेच मर्यादित ठेवा, ते रस्त्यावर आणू नये, याची काळजी सर्व धर्मीयांनी घ्यावी. धार्मिक उत्सव साजरे करण्यासाठी मोठी मैदाने राज्य सरकारने आरक्षित ठेवावीत, नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची सरकारने जबाबदारी घ्यावी, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त आणि सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वाटचालीच्या पार्श्वभूमीवर भायखळा येथील शाहीर आण्णाभाऊ साठे नाट्यगृहात दैनिक शिवनेरच्या वतीने सत्यशोधक महोत्सव रविवारी (ता 25) आयोजित केला होता. या महोत्सवात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट बोलत होते.
बापट यांनी अनिष्ट प्रथांवर सडेतोड भाष्य केले. ते म्हणाले मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरे झाले. या उत्सवात डीजे, डॉल्बी, ढोल ताशा यांच्या दणदणाटाने नागरिकांना त्रास झाला. कोणत्याही धर्माच्या उत्सवांना माझा विरोध नाही, मात्र धार्मिक उत्सव हे रस्त्यावर येता कामा नये, त्यासाठी राज्य सरकारनेच पुढाकार घ्यावा. मोकळी मैदाने सर्वांसाठी आरक्षित करावीत. त्या ठिकाणी त्यांनी धार्मिक उत्सव साजरे करावेत जेणेकरून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही आणि उत्सवही साजरे होतील. दोन-दोन महिने रस्त्याच्या मध्यभागी मंडप बांधले जातात, रस्ते अडविले जातात. स्थानिकांना त्याचा त्रास होतो हे थांबले पाहिजे.
धार्मिक उत्सव रस्त्यावर आणावे का, या विषयावर भाजपाचे ज्येष्ठ नेते मधु चव्हाण म्हणाले की माणूस हा समूहाने जगणारा प्राणी आहे. सार्वजनिक उत्सवामुळे त्याचे समूह जीवन अधोरेखित होते. महात्मा फुले यांनीही लोकांच्या सहभागाने सत्यशोधक चळवळ उभारली. अनेक महापुरुषांनी लोकसहभागातून चळवळ निर्माण केली. सर्व धर्माचे लोक सण आणि उत्सव साजरे करतात मात्र फक्त हिंदू धर्मावरच टीका का केली जाते, असा सवाल देखील चव्हाण यांनी केला.
दोनशे वर्षांचे महात्मा फुले या विषयावरील व्याख्यानात अॅड. शंकर निकम यांनी महात्मा फुले यांना समाजप्रबोधन करताना किती अडचणी आल्या याबाबत प्रभावी विवेचन केले. महात्मा फुले यांच्या मालकीच्या कंपनीने भायखळा येतील एस ब्रीज बांधला तसाच परळचा रेल्वे वर्कशॉप देखील बांधला. सीएसटी येथील महापालिका मुख्यालयाची इमारत बांधण्यात देखील महात्मा फुले यांचा मोठा वाटा होता, असे प्रतिपादन निकम यांनी केले.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आणि ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी परिसरात भाग घेतला. विषय होता ‘सत्तेच्या राजकारणात संविधानाची सचोटी आणि न्यायव्यवस्थेची कसोटी’. माहिती अधिकाराच्या माध्यमातून प्रशासनात पारदर्शकता निर्माण करण्याचे महत्त्व अनिल गलगली यांनी अधोरेखित केले तसेच धर्म, अध्यात्म आणि समाजजीवन यांचा परस्परसंबंध ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी उलगडून दाखवला. समारंभाचे आयोजक नरेंद्र विश्वनाथराव वाबळे यांनी प्रास्ताविक केले. महात्मा ज्योतिबा फुले यांचा भव्य द्विजन्मशताब्दी सोहळा साजरा करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. यावेळी रवींद्र आवटी, उद्योजक प्रकाश चिखलीकर, किरण शेठ झोडगे, विजय तांबे, चंद्रकांत खोपडे, विजय झांजुरे आदी उपस्थित होते.
महोत्सवाची सांगता ‘लोकशास्त्र सावित्री’ या नाटकाच्या प्रयोगाने करण्यात आली.





