मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) – महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे, गंभीर आजारांचे वेळेत निदान व्हावे आणि उपचारासाठी योग्य वेळी मार्गदर्शन मिळावे, या सामाजिक उद्देशातून भांडुप पश्चिम प्रभाग क्रमांक ११४च्या शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांच्या पुढाकाराने महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका व टाटा स्मारक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक कार्यालय, लालशेठ कंपाउंड, भांडुप (पश्चिम) येथे पार पडणार आहे.
राजोल पाटील या आपल्या प्रभागातील महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात. महिलांना आरोग्याविषयी जागरूक करणे, प्रतिबंधात्मक तपासण्यांचे महत्त्व पटवून देणे आणि वेळेत उपचार मिळावेत यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. महिलांचे निरोगी जीवन हेच कुटुंबाच्या आणि समाजाच्या प्रगतीचे आधारस्थान असल्याची त्यांची भूमिका असून, त्याच उद्देशाने या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये महिलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाची तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. या आजारांचे वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे कोणताही संकोच न बाळगता महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजोल पाटील यांनी केले आहे. वेळेत तपासणी म्हणजे सुरक्षित आरोग्य आणि लवकर निदान, योग्य उपचार व निरोगी जीवन हा संदेश देत राजोल पाटील यांनी प्रभागातील सर्व महिलांना या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही केवळ जबाबदारी नसून सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले असून, भविष्यातही महिलांच्या हितासाठी असे लोकाभिमुख व आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




