ठाणे प्रतिनिधी – ठाण्यात रात्रीच्या गस्तीवर असताना पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) किसन भोईर यांची एका कुख्यात गुंडाने निर्घृण हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे महाराष्ट्र पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि रेकॉर्डवरील स्थानिक गावगुंड राजू वाल्मिकी याला तात्काळ अटक केली आहे.
हाती आलेल्या वृत्तानुसार, चितळसर पोलीस ठाण्याचे 56 वर्षीय पीएसआय किसन भोईर हे 24 सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री आपल्या सहकाऱ्यांसह पोखरण रोड क्रमांक 2 परिसरातील गांधीनगर आणि सुभाषनगर भागात गस्त घालत होते. यावेळी आरोपी राजू वाल्मिकी हा सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर बसून उघडपणे मद्यपान करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
भोईर यांनी त्याला हटकले आणि पोलीस व्हॅनमध्ये बसण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. आरोपी राजू वाल्मिकी याने पोलीस उपनिरीक्षक भोईर यांच्यावर पाठीमागून बांबू, दगड आणि सिमेंटच्या विटेने डोक्यात भीषण प्रहार केला. तसेच त्यांना जोरदार धक्का देऊन खाली पाडले, ज्यामुळे भोईर जमिनीवर डोक्यावर आदळले. डोक्याला जबर मार लागल्यामुळे आणि गंभीर दुखापत झाल्याने पीएसआय किसन भोईर यांचा जागीच मृत्यू झाला.
गंभीर जखमी अवस्थेतही सहकाऱ्यांच्या मदतीने आरोपी राजू वाल्मिकीला पळून जाण्यापूर्वीच जागीच पकडण्यात आले आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरूडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणी आरोपी राजू वाल्मिकी विरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) , 132, 121 आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. गणपती विसर्जनाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावर असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचीच हत्या झाल्याने ठाणे शहर आणि पोलीस वर्तुळात तीव्र संताप व सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
ठाणे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी राजू वाल्मिकी हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.तो मूळचा पोखरण रोड क्रमांक 2, गांधीनगर (ठाणे) परिसरातील रहिवासी असून, स्थानिक भागात त्याची गावगुंड म्हणून मोठी दहशत होती. त्याच्यावर यापूर्वीही स्थानिक पोलीस ठाण्यात मारामारी, उच्छाद मांडणे, सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे आणि धमकावणे अशा विविध गुन्ह्यांची नोंद आहे.






