मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेचे वार्षिक बजेट हजारो कोटी रुपयांचे असतानाही पालिकेच्या रुग्णालयांमधील नर्सिंग कर्मचाऱ्यांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा मुद्दा शिवसेना गटनेते आणि स्थायी समिती सदस्य अमेय घोले यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. विशेषतः पालिकेच्या केईएम रुग्णालयात नर्सेससाठी पुरेशा आणि सुसज्ज चेंजिंग रूम उपलब्ध नसल्याने त्यांना दररोज गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णसेवेत दिवस-रात्र कार्यरत असलेल्या नर्सिंग कर्मचाऱ्यांना ड्युटीपूर्वी आणि ड्युटीनंतर गणवेश बदलण्यासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि स्वतंत्र जागा आवश्यक असते. मात्र, केईएम रुग्णालयासह काही पालिका रुग्णालयांमध्ये चेंजिंग रूमची संख्या अपुरी असून उपलब्ध सुविधांची अवस्थाही समाधानकारक नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे नर्सेसच्या गोपनीयता, सुरक्षितता आणि सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एका बाजूला महापालिका आरोग्य सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असल्याचा दावा करत असताना, दुसऱ्या बाजूला रुग्णसेवेचा कणा असलेल्या नर्सिंग कर्मचाऱ्यांनाच मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व पालिका रुग्णालयांमध्ये नर्सिंग कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र, प्रशस्त आणि सुसज्ज चेंजिंग रूमची तातडीने उभारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत महापालिका प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता नर्सिंग कर्मचारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.





