मुंबई, दि. ३० (क्रीडा प्रतिनिधी) – मुंबई क्रिकेट संघटनेत प्रशिक्षक आणि निवड समिती सदस्य म्हणून काम करणाऱ्या नव्या पिढीने कोणत्याही प्रकारच्या ‘मस्काबाजी’च्या मोहात न पडता गुणवत्तेलाच प्राधान्य द्यावे, असा स्पष्ट आणि परखड सल्ला हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू संदीप पाटील यांनी दिला. जिमखान्याचा गौरव, वैभव आणि शान टिकवायची असेल, तर जिमखान्यातील जास्तीत जास्त गुणवंत खेळाडूंना संधी कशी मिळेल, याचाच विचार करा. असे झाले तर मुंबई क्रिकेट अधिक समृद्ध होईल, असे ते म्हणाले.
शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने मुंबई क्रिकेट संघाच्या मेंटॉरपदी संदीप पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल तसेच जिमखान्याच्या सदस्यांची एमसीएच्या विविध संघांवर प्रशिक्षक आणि निवड समिती सदस्य म्हणून झालेल्या निवडीबद्दल आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. जिमखान्याच्या नऊ सदस्यांची एमसीएच्या विविध संघांवर वर्णी लागली आहे त्यानिमित्त या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
बालमोहन शाळेतून क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा माझी आई म्हणायची, तू शिवाजी पार्क जिमखान्यासाठी खेळलास, तर आयुष्यात सर्व काही मिळवल्यासारखे होईल. त्या एका वाक्याने माझ्या मनात जिमखान्याबद्दल अपार आदर निर्माण झाला, असे सांगत पाटील यांनी आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला.
जिमखान्याच्या पायऱ्यांवर बसून क्रिकेट पाहताना अजित वाडेकर, विजय मांजरेकर, रमाकांत देसाई, बाळू गुप्ते, सुभाष गुप्ते, पद्माकर शिवलकर आणि मनोहर हर्डीकर यांसारख्या दिग्गजांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यांना पाहता पाहताच क्रिकेटचे धडे मिळाले. हीच जिमखान्याची खरी परंपरा आणि ताकद आहे, असे ते म्हणाले.
सध्याच्या जिमखान्याच्या कार्याचे कौतुक करताना त्यांनी प्रवीण अमरे आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. जिमखाना योग्य दिशेने वाटचाल करत आहे. ही परंपरा अशीच पुढे सुरू राहावी आणि मुंबई क्रिकेटला सातत्याने नवे गुणवंत खेळाडू मिळावेत,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आठ नव्या गुरूंचा गौरव
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विविध संघांवर प्रशिक्षक व निवड समिती सदस्य म्हणून निवड झालेल्या सुधाकर हरमळकर, प्रशांत सावंत, जयदीप पाल, आशिष महाडेश्वर, कल्पना मुरकर, अमित पागनीस, बिमेश शहा आणि जय धुरी या नव्या गुरूंचा शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण अमरे, कार्याध्यक्ष दीपक मुरकर, सरचिटणीस संजीव खानोलकर आणि सहसचिव सुनील रामचंद्रन यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी नव्या जबाबदारीसाठी सर्व प्रशिक्षक व निवड समिती सदस्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.






