— चाँद शेख
आज २२ जून, जागतिक वर्षावन दिवस. यंदाची थीम आहे ‘The Forest Within You’ — म्हणजेच ‘तुमच्यातील जंगल’. अर्थात ही थीम सांगते की, जंगले केवळ बाहेरच्या पर्यावरणाचा भाग नाहीत, तर ती आपल्या अस्तित्वाचा, श्वासाचा, मनाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत. पण प्रश्न म्हणजे — आपण खरोखरच या ‘आतल्या जंगला’ जपत आहोत का? संत तुकाराम महाराजांनी या नात्याला “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।।” या अभंगातून अधोरेखित केले आहे. वृक्ष, वेली, वनचरे आणि पक्षी ही आपली सोयरी (नातलग) आहेत — ही भावना त्यातून व्यक्त होते; त्यांचे अस्तित्व म्हणजे आपलेच अस्तित्व.
गेली काही दशके आपण ‘विकास’ या शब्दाचा जो अर्थ केला आहे, तो बहुधा अंध, गर्विष्ठ आणि विध्वंसक आहे. काँक्रीटच्या जंगलांना आपण प्रगती म्हणतो, तर नैसर्गिक जंगलांना अडथळा मानतो. पण वस्तुस्थिती अशी की, जंगले ही या पृथ्वीची फुप्फुसे आहेत. ऑक्सिजन देतात, पाणी साठवतात, हवामान नियंत्रित करतात, लाखो प्रजातींना आधार देतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे — जंगले माणसाच्या मानसिक आरोग्याशी, आध्यात्मिक शांतीशी जोडलेली आहेत.
विकासाची ही ‘हिरवीगार’ तोड
आपण पहातोय — रस्ते, धरणे, औद्योगिक वसाहती, आयटी पार्क्स, शॉपिंग मॉल्स या सगळ्यांच्या नावाखाली आपण अमेझॉन, बोर्नियो, सुंदरबन, पश्चिम घाट… या अमूल्य वनराईचा नाश करत आहोत. जगभरात दर मिनिटाला फुटबॉल मैदानाच्या ४० पट जंगल नष्ट होत असल्याची आकडेवारी डोळे उघडून दाखवते.
आपल्या महाराष्ट्रातील विदर्भातील वनक्षेत्राचीही हीच कहाणी कोळसा उत्खनन, रस्ते विस्तार, अतिक्रमणं यामुळे हजारो हेक्टर जंगल संपुष्टात येत आहे. आणि याचा परिणाम? गेल्या वर्षी जून-जुलैमध्ये विदर्भात जी अतिवृष्टी, पूर, नंतर दुष्काळ याचा अनुभव आपण घेतलाच, हे सगळे निसर्गाच्या संतुलनाशी जोडलेले आहे. या विसंवादाच्या मुळाशी आपण तुकारामांनी सांगितलेली ‘सोयरिकता’ विसरलो आहोत. आपण आपल्याच नातलगांची जंगले तोडतो आहोत, म्हणूनच निसर्गाचा प्रतिसाद कुठे महापूर तर कुठे दुष्काळ इतका कठोर होतो आहे.
जंगलतोडीमुळे वाढणारी उष्णता, बदलता हंगाम, अवकाळी पाऊस, कमी होते पाण्याची पातळी, मातीची धूप, जैवविविधतेचे प्रचंड नुकसान. नुकताच आला ‘हीटवेव्ह’चा कहर सांगतोय — हवामान बदल आपल्या दारी उभा आहे, आणि त्याची पहिली बळी ठरते ती निसर्गाची सर्वात महत्त्वाची साथी — वर्षावने.
‘आतले जंगल’ शिल्लक आहे का?
‘द फॉरेस्ट विदिन यू’ ही संकल्पना फक्त रूपक नाही. मानवी मन हे जंगलासारखेच असते — शांत, गहिरे, संवेदनशील, विविधतेने नटलेले, वैविध्यपूर्ण. पण जसं बाह्य जंगल नष्ट होतं, तशी आपली आंतरिक शांती, धैर्य, संवेदना, प्रेम आणि करुणा सुद्धा कोरडी पडते. तुकारामांचा अभंग सांगतो की, जोपर्यंत आपण पक्ष्यांचे ‘सुस्वरे आळवणे’ (गोड आवाज) ऐकू शकत नाही, तोपर्यंत आपली आंतरिक वृक्षवल्लीही कोरडी पडते.
ज्या समाजात झाडे तोडली जातात, तिथे नाती सुद्धा तुटतात. कारण हिरवळीशिवाय जगणं फक्त जगणं राहतं, जीवन नाही.
जपायचं तर आतापासून
या चिंतनाचा उद्देश भय निर्माण करणे नसून, जागृती निर्माण करणे आहे. विकासाला नकार नाही — पण तो शाश्वत, पर्यावरणपूरक, स्थानिक अधिकारांचा आदर करणारा हवा. लागवडीपेक्षा जपणूक अधिक महत्त्वाची. एक झाड वाढायला १० वर्षे, पण तोडायला १० मिनिटे. हे अंतर कमी करण्याची जबाबदारी फक्त सरकारची किंवा पर्यावरणवाद्यांची नाही — ती प्रत्येकाची आहे. तुकारामांचा हा अभंग आपल्याला आठवण करून देतो की, निसर्गाशी ‘व्यवहार’ नव्हे, तर ‘नाते’ हवे. जेव्हा आपण पक्ष्यांच्या किलबिलाटात त्यांचे ‘आळवणे’ (संवाद) ऐकू, तेव्हाच खरी जागृती होईल.
प्रत्येकाने आपल्या कुंडीत एक झाड लावावे, एक पाण्याचा थेंब वाचवावा, प्लास्टिक टाळावे, जंगलतोडीच्या विरोधात आवाज उठवावा — हेच खरे ‘जंगल जपण्याचे’ कृतीशील चिंतन.
समारोप…
आपल्या पूर्वजांनी निसर्गाला देव मानला, कारण तोच जीवनदाता आहे. आपण त्याला ‘संसाधन’ मानले आणि संपवायला निघालो. पण हे समजून घ्या — जोपर्यंत जंगले हसत नाहीत, तोपर्यंत माणूस खरोखर सुखी राहूच शकत नाही. कारण जंगले, वनचरे व पक्षी ही आपली सोयरी आहेत, हे संत तुकारामांचे सांगणे आज अधिक प्रासंगिक झाले आहे.
या ‘जागतिक वर्षावन दिवसा’निमित्त एक शपथ घेऊया — जंगले वाचवू, पाणी वाचवू, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘आपल्यातील जंगल’ जपू. कारण आपली सुटका फक्त झाडांमध्येच आहे, काँक्रीटमध्ये नाही.
*हिरवा गंध कायम राहो!* 🌳
— चाँद शेख





