मुंबई प्रतिनिधी
महाडमध्ये 1 जुलै 2026 ला हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या कृषि दिनाचे औचित्य साधून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली संलग्न कृषी महाविद्यालय, महाड च्या वतीने शहरात भव्य कृषि दिंडीचे आयोजन करण्यात आले. “जपुया माती, पिकवूया मोती” या घोषणांनी महाड शहर दणाणून गेले.
सकाळी 7:30 वाजता ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराज मंदिर येथून शेकडो विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत दिंडीचा शुभारंभ झाला. निसर्ग संवर्धन, सेंद्रिय शेती, जलसंधारणाचे संदेश देणारे फलक व घोषणा देत ही दिंडी बाजारपेठ, बस स्थानक चौक, माता जिजाऊ उद्यान मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. येथे छत्रपती शिवाजी महाराज व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विद्यार्थ्यांनी ‘शेतकऱ्यांच्या समस्या’, ‘माती परीक्षण’ व ‘पाणी परीक्षण’ या विषयांवर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले.
यावेळी प्रमुख पाहुणे तहसीलदार महेश शितोळे म्हणाले, “कृषी दिन म्हणजे केवळ उत्सव नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टाचा, घामाचा गौरव दिन आहे. महाडसारख्या क्रांतीभूमीतून शेतीच्या नव्या क्रांतीची सुरुवात होणे अभिमानास्पद आहे. कृषी महाविद्यालयाचा हा उपक्रम रायगड जिल्ह्यासाठी दिशादर्शक ठरेल.”
1 जुलै पासून रोटरी इंटरनॅशनल व लायन्स क्लब्स इंटरनॅशनल या सेवाभावी आंतरराष्ट्रीय संस्थांचे नवीन वर्ष सुरू होत असल्याने, वर्षभर समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल मान्यवरांचा सन्मानचिन्ह व वृक्ष रोप देऊन गौरव करण्यात आला.
त्यानंतर दिंडी श्रीराम मंदिर मार्गे ऐतिहासिक चवदार तळ्यावर पोहोचली. येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून सहभागी नागरिकांना मोफत वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले व कार्यक्रमाचा समारोप झाला.
*यावेळी,प्रमुख उपस्थितीमध्येरोटरी अध्यक्ष सुधीर मांडवकर, रोटरी माजी अध्यक्ष जॉन्सन डिसोजा, रोटरी नवनियुक्त अध्यक्ष चेतन पलांडे रोटरी संतोष नगरकर, महाड, मंडळ कृषी अधिकारी , लांडगे सर, वनक्षेत्रपाल भोसले सर, नगरसेवक प्रमोद महाडिक, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैभव गिम्हवणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव कोकाटे, प्रा .जगन्नाथ मोरे, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल बिरवटकर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सविता यादव, रायगड कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. राहुल डुंबरे, कृषी मित्र राजेंद्र जैतपाल, प्राध्यापकांमध्ये NSS समन्वयक डॉ. रायकर, प्रियंका तडकसे, प्रा. हेडाव, मयुरी मोरे इत्यादी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय चिमणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले. पावसाची रिपरिप सुरू असतानाही विद्यार्थी, शिक्षक आणि महाडकर नागरिक मोठ्या संख्येने या दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. *दरवर्षी कृषी महाविद्यालयातर्फे हा उपक्रम राबविला जातो*





