मुंबई प्रतिनिधी
वसई-विरार शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आणि श्वानदंशाच्या वाढत्या घटनांमुळे वसई-विरार शहर महानगरपालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात अवघ्या ४ महिन्यांत १५ हजार श्वानदंशाच्या केसेस समोर आल्या आहेत.
वसई-विरार उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आणि कुत्र्यांनी चावा घेण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर समस्येची दखल घेत वसई-विरार शहर महानगरपालिकेने (VVCMC) भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या उपाययोजनांची घोषणा केली आहे. यामध्ये खाजगी संस्थांच्या मदतीने कुत्र्यांची नसबंदी मोहीम जलद गतीने राबवणे आणि त्यांच्यासाठी एक स्वतंत्र शेल्टर होम उभारणे समाविष्ट आहे.
*१ लाख कुत्रे, केवळ ३० हजारांची नसबंदी*
पालिकेच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई-विरार जुळ्या शहरांमध्ये सध्या अंदाजे १ लाख भटके कुत्रे आहेत. मात्र, यापैकी आतापर्यंत केवळ ३० हजार कुत्र्यांचीच नसबंदी करण्यात पालिकेला यश आले आहे. उर्वरित ७० हजार कुत्र्यांमुळे शहरात त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
*भयानक आकडेवारी समोर*
या वर्षाच्या जानेवारी ते एप्रिल या अवघ्या ४ महिन्यांच्या कालावधीत शहरात तब्बल १५ हजार कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. नुकतेच एका ९ वर्षांच्या चिमुकलीचा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे आणि रेबीज संसर्ग झाल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वसई-विरारमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि पालिकेच्या कारभाराविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
*वसईत ‘डॉग शेल्टर’ उभारणार*
महानगरपालिकेच्या महासभेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. वाढत्या दबावानंतर महापौर राजीव पाटील यांनी सांगितले की, कुत्र्यांच्या नसबंदीचा वेग वाढवण्यासाठी पालिकेने आता खाजगी संस्था आणि प्राणी कल्याण संघटनांची मदत घेण्याचे ठरवले आहे.






