मुंबई प्रतिनिधी
अंध बांधवांच्या समस्या फार मोठ्या आहेत. जोपर्यंत आपण त्यांच्या समस्या जाणून घेत नाही तोपर्यंत त्या समस्या आपल्याला समजत नाही. अंध बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे जाहीर प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी काळाचौकी येथील एनएसडी औद्योगिक अंधशाळेत केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सुग्रास भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले या अंधशाळेमध्ये आम्ही कॉलेजमध्ये असताना भेट दिलेली आहे. त्यावेळेस कॉलेजमधून आम्हाला या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी एनएसएस च्या माध्यमातून आणले जायचे. तेव्हा आम्हाला त्या प्रोजेक्टचे दहा मार्क मिळायचे. त्यामुळे आमचा या वास्तूसोबत फार जुना संबंध आहे. आज मी या ठिकाणी या परिसराची संपूर्ण पाहणी केली तसेच अंध बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार मी माझ्या आमदार निधीतील पाच लाख रुपये या ठिकाणी या अंध बांधवांच्या विविध कार्यासाठी देणार असे जठार यांनी जाहीर केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमोहत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विविध सामाजिक , शैक्षणिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. रामशेठ ठाकूर यांची दानशूर वृत्ती माझ्या मनाला फार भावते त्यामुळे आपण देखील एखादा चांगला कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त घ्यावा असा माझा मानस होता. हाच दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी आम्ही शिवनेर संस्थेच्या वतीने अंध बांधवांसाठी मिष्ठान्न जेवणाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये आमदार जठार यांनी उपस्थिती लावून आमचा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार आसल्याची माहिती शिवनेर संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली. या कार्यक्रमांमध्ये रयत सेवा संघाचे अध्यक्ष मुकेश पेंडसे, विविध सामाजिक कार्यकर्ते अंध विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.





