मुंबई, प्रतिनिधी : ब्रेन स्टेम मृत घोषित करण्यात आलेल्या अवयवदात्या महिलेची अवयवदान प्रक्रिया आणि अपघाती प्रकरणात आवश्यक असलेले वैद्यकीय-कायदेशीर शवविच्छेदन एकाच रुग्णालयात यशस्वीपणे पूर्ण करण्याची उल्लेखनीय कामगिरी ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र व विषशास्त्र विभागाने केली. जे. जे. रुग्णालयाच्या न्यायवैद्यक पथकाने खासगी रुग्णालयात जाऊन अशा प्रकारची प्रक्रिया पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ३९ वर्षीय महिलेला दुचाकीवरून पडल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दीर्घकाळ उपचार केल्यानंतर २६ जून २०२६ रोजी तिला नियमानुसार ब्रेन स्टेम मृत घोषित करण्यात आले. अत्यंत दुःखद परिस्थितीतही तिच्या कुटुंबीयांनी मानवतावादी भूमिका घेत अवयवदानास संमती दिली. त्यानंतर मानवी अवयव व ऊती प्रत्यारोपण कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या.
हे अपघाताशी संबंधित वैद्यकीय-कायदेशीर प्रकरण असल्यामुळे शवविच्छेदन करणे आवश्यक होते. सर्वसाधारणपणे अवयव काढल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी संबंधित शासकीय रुग्णालयात पाठवावा लागतो. त्यामुळे मृतदेहाच्या वाहतुकीत वेळ जातो आणि आधीच दुःखात असलेल्या कुटुंबीयांची प्रतीक्षा आणखी वाढते. ही अडचण टाळण्यासाठी डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याची लेखी विनंती तसेच जे. जे. रुग्णालय, रिलायन्स रुग्णालय, मुंबई पोलीस आणि झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर यांच्या समन्वयातून जे. जे.चे न्यायवैद्यक पथक थेट रिलायन्स रुग्णालयात पोहोचले.
न्यायवैद्यकशास्त्र व विषशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बी. जी. चिखलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक डॉ. एच. एन. पानशेवडीकर यांच्या नेतृत्वात डॉ. एम. एम. तिडके आणि डॉ. आर. टी. भानारकर यांच्या पथकाने ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. अवयव पुनर्प्राप्तीच्या प्रक्रियेदरम्यान न्यायवैद्यक तज्ज्ञ उपस्थित राहिले आणि त्यानंतर त्याच रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहात वैद्यकीय-कायदेशीर शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले.
अवयव पुनर्प्राप्तीची प्रक्रिया २६ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुरू झाली. महिलेचे हृदय, दोन्ही फुफ्फुसे, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडे प्रत्यारोपणासाठी काढण्यात आली. दोन्ही कॉर्नियांचेही दान करण्यात आले. शवविच्छेदन रात्री १०.३० वाजता सुरू होऊन मध्यरात्री १२.३० वाजता पूर्ण झाले. अवयव काढताना करण्यात आलेल्या शस्त्रक्रियात्मक बदलांसह उपचार आणि दुखापतींशी संबंधित प्रत्येक निष्कर्षाची स्वतंत्र, सविस्तर आणि शास्त्रीय नोंद करण्यात आली.
या समन्वयामुळे अवयवदानाच्या जीवनरक्षक प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ देण्यात आला नाही. त्याचवेळी वैद्यकीय-कायदेशीर प्रक्रियाही काटेकोरपणे पूर्ण करण्यात आली. मृतदेह दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची आवश्यकता टळल्यामुळे कुटुंबीयांची प्रतीक्षा कमी झाली आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक संवेदनशील व सन्मानपूर्वक पूर्ण करता आली.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर, मुंबईने २५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित २६व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र व विषशास्त्र विभागाला सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविले. विभागाच्या वतीने डॉ. एच. एन. पानशेवडीकर यांनी हा सन्मान स्वीकारला.
शासकीय आणि खासगी आरोग्यसंस्था, न्यायवैद्यक तज्ज्ञ, पोलीस आणि अवयव प्रत्यारोपण यंत्रणा यांच्या अचूक समन्वयाचे हे उदाहरण भविष्यात राज्यस्तरीय प्रमाणित कार्यपद्धती विकसित करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते.
छायाचित्र ओळ : झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर, मुंबईकडून न्यायवैद्यकशास्त्र व विषशास्त्र विभागाला प्रदान करण्यात आलेल्या सन्मानचिन्हासह सहयोगी प्राध्यापक डॉ. एच. एन. पानशेवडीकर.





