मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते अशरफ आझमी यांनी महापालिका आयुक्त मा. श्रीमती अश्विनी भिडे (IAS) यांना पत्र देऊन एल विभागाचे दोन स्वतंत्र प्रशासकीय विभागांमध्ये विभाजन करण्याच्या प्रलंबित प्रस्तावाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
आपल्या निवेदनात श्री. आझमी यांनी नमूद केले आहे की, कुर्ला, साकीनाका, चांदिवली आणि परिसराचा समावेश असलेला एल विभाग हा मुंबईतील सर्वात मोठ्या प्रशासकीय विभागांपैकी एक असून येथे सुमारे ९ लाख नागरिक आणि १६ निवडणूक प्रभाग आहेत. प्रभावी प्रशासन आणि नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मागील महापालिका कार्यकाळात एल विभागाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, तो अद्यापही प्रलंबित आहे.
साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय नागरिकाचा झालेला दुर्दैवी मृत्यू, तसेच वारंवार होणारे पाणी साचणे, नाल्यांची अपुरी सफाई, पावसाळ्यापूर्वीच्या कामांतील विलंब आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणातील दिरंगाई या सर्व बाबी एल विभागाच्या विभाजनाची गरज अधोरेखित करतात, असेही त्यांनी म्हटले आहे.
“एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा आणि विस्तीर्ण क्षेत्राचा कारभार एका प्रशासकीय विभागाकडून प्रभावीपणे चालविणे शक्य नाही. एल विभागाचे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आल्यास नागरिकांना अधिक जलद, उत्तरदायी आणि कार्यक्षम नागरी सेवा मिळतील,” असे श्री. आझमी यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाने एल विभागाच्या विभाजनाचा प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.





