मुंबई, प्रतिनिधी
मुंबई शहरात आज पर्यंत हजारो रस्ता,चौक यांना नावे देण्याची कार्यक्रम चाहत्यांच्या मोठ्या गर्दीत संपन्न झाले आहेत. अनेक मोर्चे, आंदोलने रस्त्यावर होत असतात, फेरीवाल्यांनी मुंबईतला प्रत्येक पदपथ व रस्ता अडवलेला आहे.असे चित्र असताना काल फोर्ट मधील एका चौकाला अधिकृतरित्या समाजवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते, कामगारांचे कैवारी, ‘बंद सम्राट’, माजी रेल्वेमंत्री, माजी संरक्षणमंत्री, कोकण रेल्वेचे सहशिल्पकार जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव देण्याच्या समारंभासाठी उभारण्यात आलेला मंच पोलिसांनी काढायला भाग पाडून जॉर्ज फर्नांडिस यांच्या देशसेवेचा अपमान केल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली व पोलिसांचा निषेधही केला.
पद्मविभूषण साथी जॉर्ज फर्नांडिस यांची काल जयंती होती. मुंबई महानगरपालिकेने कुलाबा येथील एका चौकास “पद्मविभूषण साथी जॉर्ज फर्नांडिस चौक” असे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे म्युनिसिपल इंजिनियर असोसिएशन ने काल बुधवारी ३ जून २०२६ रोजी जयंतीदिनी नामफलक लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी पालिका व वाहतूक पोलिसांकडून कार्यक्रमाची रीतसर परवानगी घेतलेली होती.असे असताना एम आर ए मार्ग पोलिसांनी तेथे उभारण्यात आलेले १५ × १० फूट व्यासपीठ ऐनवेळी काढून टाकण्याचा तगादा लावून ते हटविण्यास आयोजकास भाग पाडले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्ते, महापालिका कर्मचारी, अधिकारी आणि कामगारांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली.
देशाच्या राजकारणात आणि कामगार चळवळीत अमूल्य योगदान देणाऱ्या, लोकशाही रक्षणासाठी आणीबाणीच्या काळात संघर्ष करणाऱ्या आणि केंद्रीय मंत्री म्हणून देशसेवा करणाऱ्या साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावाने आयोजित कार्यक्रमातच अशा प्रकारे अडथळे निर्माण होणे ही केवळ प्रशासकीय बाब नसून त्यांच्या स्मृतीबाबत शासनाच्या उदासीन आणि दुजाभावाच्या भूमिकेचे प्रतीक असल्याची भावना कामगाराढे निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. हा कार्यक्रम महापालिकेच्या वतीने साजरा करायला पाहिजे होता पण त्यांनी तो केला नाही उलट हा आमचं कार्यक्रम नाहीं असं ते सांगत होते. असे आयोजकांनी सांगितले.
देशातील अनेक नेत्यांच्या स्मृती जपण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जातात. मात्र साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याच्या नावाने आयोजित कार्यक्रमाला आवश्यक परवानग्या असूनही अडथळे आणले गेले हा गंभीर प्रश्न आहे. हा प्रकार त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कामगार व सामान्य नागरिकांच्या भावनांचा अवमान करणारा आहे.
समस्त महापालिका अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि कामगार या घटनेचा तीव्र निषेध करीत असून शासनाने याबाबत तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“साथी जॉर्ज फर्नांडिस हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर संघर्ष, कामगार हक्क आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक होते. त्यांच्या स्मृतीबाबत कोणताही दुजाभाव आम्ही सहन करणार नाही.” असा इशारा उपस्थित
समस्त महापालिका अभियंते, अधिकारी, कर्मचारी व कामगार यांनी दिला आहे.





