केतन खेडेकर
आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून जिच्याकडे पाहिले जाते. त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता बसून आठ महिने झाले आहेत. तर स्वीकृत नगरसेवकांनी पदभार स्वीकारून 6 महिने होऊन गेले. परंतु अजूनही स्वीकृत नगरसेवकांना नगरसेवक निधी आणि विकास निधी मिळाला नसल्याने या स्वीकृत नगरसेवकांना लोकांचे कामे करणे आणि त्यांना निधी देणे फार अवघड झाले आहे. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर निधी द्यावा अशी मागणी स्वीकृत नगरसेवक करत आहेत.
आम्हाला स्वीकृत नगरसेवक होऊन सहा महिन्यापेक्षा जास्त काळ झाला. आमच्या जनसंपर्क कार्यालयात दररोज अनेक माणसे विकासाची कामे घेऊन येत असतात. आम्ही जनतेची कामे करण्यासाठीच आलो आहोत आणि आम्हाला जनतेची कामेच करायची आहेत परंतु आमच्याकडे अजून निधी नसल्याने आम्हाला कामे करणे अवघड होत आहे. याबाबत आम्ही आमच्या पक्षाचे गटनेते अमेय घोले तसेच महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र देणार आहोत. तसेच शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना हा विषय समजून सांगणार आहोत. आम्हाला खात्री आहे की ते नक्कीच आम्हाला निधी उपलब्ध करून देतील अशी माहिती शिवसेनेचे स्वीकृत युवा नगरसेवक राज प्रकाश सुर्वे यांनी दिली.





