ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Thursday, August 27, 2026 3:14 pm

सहा वर्षे कमरेत वाकलेले आयुष्य एका शस्त्रक्रियेत झाले सरळ; ३२ वर्षीय तरुण पुन्हा ताठ उभा!


मुंबई प्रतिनिधी

साधी पाठदुखी समजून दुर्लक्ष केलेली वेदना एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते, याचा धक्कादायक अनुभव हिंगोलीतील ३२ वर्षीय शिवराज महादेव जवने यांनी घेतला. तब्बल सहा वर्षे पाठदुखी, शरीरातील कडकपणा, चालताना होणारा त्रास आणि झोपण्यापासून ते समोर पाहण्यापर्यंतच्या अडचणींशी झुंज देणाऱ्या शिवराज यांचा मणका हळूहळू इतका पुढे वाकला की त्यांना सरळ उभे राहणेही अशक्य झाले होते.

शिवराज हे लहानपणापासून निरोगी आणि उत्साही होते. संगणकशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर त्यांनी हिंगोलीतील एका बँकेत नोकरीही सुरू केली होती. मात्र, २०२० मध्ये त्यांच्या पाठीत सतत दुखू लागले. सुरुवातीला त्यांनी ही नेहमीची पाठदुखी समजून त्याकडे दुर्लक्ष केले आणि काम सुरूच ठेवले. मात्र, वेदना कमी होण्याऐवजी वाढत गेल्या आणि त्यासोबतच शरीरात कडकपणा निर्माण होऊ लागला.

२०२१ मध्ये तपासणीनंतर त्यांना अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस या दुर्मीळ दाहक आजाराचे निदान झाले. याच काळात कोरोनाच्या संकटामुळे सर्वांचे लक्ष महामारीकडे असताना शिवराज मात्र असह्य पाठदुखीने त्रस्त होते. कालांतराने त्यांच्या मणक्याची हालचाल कमी होत गेली आणि पाठ पुढच्या बाजूला वाकत गेली. बसणे, झोपणे, चालणे, वाकणे आणि समोर पाहणे यांसारख्या दैनंदिन गोष्टीही त्यांच्यासाठी मोठे आव्हान बनल्या.

वेदना एवढ्या तीव्र झाल्या की २०२२ मध्ये त्यांना नोकरी सोडावी लागली. त्याच वयातील तरुण शिक्षण, नोकरी, प्रवास आणि भविष्याची स्वप्ने पूर्ण करण्यात व्यस्त असताना शिवराज यांचा दिवस उभे राहणे आणि काही अंतर चालणे यासाठीच संघर्ष करण्यात जात होता. मणका सतत पुढे वाकल्यामुळे शरीराचा भार एका बाजूवर अधिक पडत गेला आणि त्याचा परिणाम त्यांच्या कंबरेसोबतच कंबरेच्या सांध्यावरही झाला.

वाढत्या विकृतीमुळे २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात त्यांच्या कंबरेच्या सांध्यावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, मणक्याची समस्या कायम होती. याच काळात त्यांना सरळ उभे राहण्यास मदत करणाऱ्या उपचारांबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी मुंबईतील सर जे.जे. समूह रुग्णालयातील मुख्य स्पाईन सर्जन, असोसिएट प्रोफेसर तथा ऑर्थोपेडिक अँड स्पाईन युनिटचे प्रमुख डॉ. धिरज सोनावणे यांच्याशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला.

शिवराज यांना १५ जुलै २०२६ रोजी सर जे.जे. समूह रुग्णालयात दाखल करण्यात आले. एचएलए-बी२७ चाचणीसह संपूर्ण मणक्याचा एक्स-रे आणि अन्य तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमध्ये अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिसमुळे त्यांच्या मणक्यात अत्यंत गंभीर विकृती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. मणका पुढच्या बाजूला कमानीसारखा वाकल्याने त्यांच्या शरीराची ठेवण, चालण्याची क्षमता, संतुलन आणि दैनंदिन हालचालींवर मोठा परिणाम झाला होता.

डॉ. धिरज सोनावणे यांनी सांगितले की, अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस हा शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेशी संबंधित दीर्घकालीन दाहक आजार आहे. या आजारात मणक्याच्या सांध्यांभोवती आणि लिगामेंट्समध्ये दाह निर्माण होतो. कालांतराने नवीन हाड तयार होऊन मणक्याचे सांधे एकमेकांना जखडले जातात आणि मणका हळूहळू कठीण व ताठर बनतो. त्यामुळे त्याची नैसर्गिक लवचिकता कमी होत जाते. या आजाराचे प्रमाण अंदाजे दोन लाख व्यक्तींमागे एक इतके असल्याचे सांगितले जाते, तर त्यातून निर्माण होणारी गंभीर किफोसिस विकृती आणखी दुर्मीळ असून सुमारे ४० लाख व्यक्तींमागे एका रुग्णात आढळते.

शिवराज यांच्या प्रकरणात मणका पूर्णपणे कडक झाल्याने आणि पुढे वाकल्याने शस्त्रक्रियाही अत्यंत आव्हानात्मक होती. १७ जुलै रोजी त्यांच्या मणक्याची करेक्टिव्ह ऑस्टिओटॉमी करण्याचे नियोजन करण्यात आले. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला ऑपरेशन टेबलवर झोपवणे हेच मोठे आव्हान होते. वाकलेल्या मणक्यामुळे त्यांच्या शरीराखाली मोठी यू-आकाराची पोकळी तयार होत होती. त्यामुळे विशेष पद्धतीने ऑपरेशन टेबलचा कोन बदलण्यात आला आणि डोके, डोळे, पोट तसेच वाकलेल्या मणक्यावर अतिरिक्त दबाव पडणार नाही, याची काळजी घेण्यात आली. डॉ. सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुतेज, डॉ. दीपक शिसोदिया आणि डॉ. अर्जुन सेठी यांच्या टीमने, तसेच भूलतज्ज्ञ डॉ. प्रेरणा शिंगारे आणि विभागप्रमुख प्रा. उषा बडोले यांच्या सहकार्याने ही गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडली.

सुमारे ४५ अंशांचा अचूक कोन लक्षात घेऊन कमरेच्या मणक्यातील हाडाचा पाचरीच्या आकाराचा भाग काढण्यात आला आणि त्यानंतर मणका हळूहळू सरळ करण्यात आला. विशेष रॉड्स आणि स्क्रूच्या साहाय्याने मणक्याला स्थिर करण्यात आले. तब्बल ७ ते ८ तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर सहा वर्षांपासून पुढे वाकलेल्या शिवराज यांचा मणका पुन्हा सरळ करण्यात डॉक्टरांना यश आले. शस्त्रक्रियेनंतर त्यांना सरळ उभे राहता, समोर पाहता आणि चालता येऊ लागले. पुढील उपचारांत फिजिओथेरपी, पुनर्वसन आणि हळूहळू हालचाल वाढविण्याचा सल्ला देण्यात आला. शिवराज यांना २३ जुलै रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यांना जड वस्तू उचलणे व जास्त वाकणे टाळण्यासह नियमित व्यायाम आणि फॉलोअप घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology