मुंबई प्रतिनिधी : अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारे तीनपट शुल्क तातडीने रद्द करावे, अशी मागणी शिवसेना सचिव ॲड. वैभव मारुती थोरात यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती मा. ना. श्री. सचिन अहिर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मा.श्री. सचिन अहिर सो. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट कोटा तीन पट शुल्क ०९.०९.२०२६.pdf
नियमित प्रवेश प्रक्रियेत प्रवेशापासून वंचित राहिलेले अनेक विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्याकडे वळतात. विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे, घरापासून सोयीचे अथवा ये-जा करण्यास सुलभ असलेले महाविद्यालय निवडण्याची इच्छा असते. मात्र, अभियांत्रिकी प्रवेशातील तीव्र स्पर्धेमुळे एक-दोन पर्सेंटाईलच्या फरकामुळेही विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेण्याचा पर्याय स्वीकारतात.
मात्र, मॅनेजमेंट कोट्याचे शुल्क नियमित शुल्काच्या तीनपट झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही शुल्कवाढ शिक्षणाच्या संधीवरच मर्यादा आणणारी ठरत असल्याचे ॲड. थोरात यांनी निवेदनात म्हटले आहे.
“एकाच महाविद्यालयात, एकाच वर्गात, एकाच अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याकडून नियमित शुल्क आणि दुसऱ्या विद्यार्थ्याकडून त्याच्या तीनपट शुल्क आकारले जाणे हे शैक्षणिक समानतेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे?” असा सवालही ॲड. थोरात यांनी उपस्थित केला आहे.
शिक्षणामध्ये समान संधी आणि समानतेचे तत्त्व महत्त्वाचे असताना, केवळ प्रवेशाचा मार्ग वेगळा असल्यामुळे विद्यार्थ्यांवर एवढा मोठा आर्थिक भार टाकणे अन्यायकारक आहे. या निर्णयाचा थेट परिणाम विद्यार्थी आणि पालकांच्या आर्थिक परिस्थितीवर होत असून, त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मा.श्री. सचिन अहिर सो. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट कोटा तीन पट शुल्क ०९.०९.२०२६.pdf
त्यामुळे मॅनेजमेंट कोट्यातील तीनपट शुल्क आकारण्याचा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा आणि याबाबत संबंधितांना त्वरित आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी ॲड. वैभव थोरात यांनी केली आहे.





