उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, मेट्रो रेल्वेच्या कामामुळे गेल्या ९ वर्षांपासून बंद असलेली BEST बससेवा ११ सप्टेंबरपासून गिरगावच्या रस्त्यावर पुन्हा धावणार आहे.
दक्षिण मुंबईचे माजी विभागप्रमुख तथा माजी नगरसेवक दिलीप नाईक हे गेल्या तीन महिन्यांपासून बससेवा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असूनही बससेवा सुरू होण्यास होत असलेल्या विलंबाबाबत BEST समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव या संतप्त झाल्या. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करत प्रवाशांची गैरसोय तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या. प्रवाशांच्या समस्यांबाबत संवेदनशील भूमिका घेत तृष्णा विश्वासराव यांनी बससेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी ठाम भूमिका घेतल्याने गिरगावकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यासंदर्भात विश्वासराव यांच्या दालनात झालेल्या बैठकीला शिवसेना पदाधिकारी प्रथमेश शाह, निलेश भोईटे, कविता मल्हार तसेच संबंधित BEST अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत अधिकाऱ्यांनी ११ सप्टेंबरपासून गिरगावातून बससेवा सुरू करून ती किमान ठाकूरद्वार नाका पर्यंत नेण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यानंतर महार्षी कर्वे मार्गावरून बस पुढे नेण्यात येणार आहे. गणपती विसर्जनानंतर चिराबाजार मार्गावरूनही बससेवा सुरू होईल, अशी ग्वाही तृष्णा विश्वासराव यांनी दिली.
दरम्यान, गिरगावातील चार BEST बसथांब्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक Q-Bus Shelter उभारण्याचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.





