*प्रतिनिधी | विक्रांद टाइम्स* छत्रपती संभाजीनगरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी **इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर (IIIT Nagpur)* येथील विद्यार्थी *अपूर्व मुंदडा* यांनी केली आहे. विद्यार्थी प्रशासन परिषद (Student Governance Council – SGC) निवडणूक *२०२६–२७* मध्ये त्यांची **महासचिव (General Secretary)** या प्रतिष्ठेच्या पदावर निवड झाली असून, या यशामुळे संभाजीनगरच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एका मानाच्या पानाची भर पडली आहे. अपूर्व मुंदडा हे छत्रपती संभाजीनगर (पैठण ) येथील ज्येष्ठ पत्रकार, *विक्रांद टाइम्स* आणि *अग्रसेन टाइम्स* चे संपादक *अरुणकुमार एस. मुंदडा* यांचे चिरंजीव आहेत. पत्रकारितेतील सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि लोकहिताची परंपरा लाभलेल्या कुटुंबातील अपूर्व यांनी आपल्या गुणवत्तेच्या, नेतृत्वक्षमतेच्या आणि सातत्यपूर्ण परिश्रमांच्या बळावर देशातील नामांकित तंत्रज्ञान संस्थेत विद्यार्थी नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. IIIT नागपूरच्या निवडणूक समितीने जाहीर केलेल्या अधिकृत निकालानुसार, *दि. २८ जुलै २०२६ रोजी* शैक्षणिक इमारतीतील परिषद सभागृहात (Conference Hall) सर्व उमेदवार आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत निकाल जाहीर करण्यात आले. त्यानंतर हे निकाल संस्थेच्या ऑनलाइन माध्यमावरही प्रसिद्ध करण्यात आले. या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून लोकशाही मूल्यांवर आधारित, शांततापूर्ण आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेला यशस्वी केले. सध्या *तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेले अपूर्व मुंदडा* हे केवळ अभ्यासातच नव्हे, तर नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधण्याच्या वृत्तीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. *प्रखर बुद्धिमत्ता, अपार मेहनत, सकारात्मक दृष्टिकोन आणि अत्यंत मनमिळावू स्वभाव* ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यापक विश्वास संपादन करण्यात त्यांना यश आले असून, महासचिवपदासाठी त्यांची निवड ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्यक्षमतेचा गौरव मानली जात आहे. तंत्रज्ञान शिक्षणाबरोबरच विद्यार्थी कल्याण, शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक उपक्रम, नवोपक्रम आणि संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी आता अपूर्व यांच्या खांद्यावर आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी प्रशासन परिषद अधिक परिणामकारक आणि विद्यार्थीकेंद्री कार्य करेल, असा विश्वास विद्यार्थी वर्गातून व्यक्त होत आहे. अपूर्व मुंदडा यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल छत्रपती संभाजीनगरातील पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. *विक्रांद टाइम्स/अग्रसेन टाइम्स* *आणि दैनिक शिवनेर* परिवारातर्फे अपूर्व मुंदडा यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक आणि नेतृत्वपूर्ण वाटचालीस हार्दिक शुभे जीच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. त्यांच्या या यशामुळे छत्रपती संभाजीनगरच्या नव्या पिढीसमोर कर्तृत्व, गुणवत्ता आणि नेतृत्वाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
रक्तदानाने आपण एखाद्याचा जीव वाचवु शकतो, शशिकांत निकम, शिवसेना शिवडी विधानसभा प्रमुख
केतन खेडेकर रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठ दान असून नागरिकांनी रक्तदान जरूर करावे. नियमित रक्तदान केल्याने आपण अनेक रुग्णाचा जीव वाचवू शकतो असा सामाजिक संदेश शिवसेना शिवडी विधानसभा विभाग प्रमुख शशिकांत निकम यांनी काळाचौकी येथील शिवाजी हॉल येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दिला. या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. या शिबिरात प्रत्येक रक्तदात्यास उत्कृष्ट भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान असून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. रक्तदान केल्यामुळे आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो. याच भावनेतून आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा विषय कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती शिवसेना शिवडी विधानसभा विभागप्रमुख शशिकांत निकम यांनी दिली. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा, सभापती सचिन अहिर, माजी आमदार दगडू दादा सकपाळ, महिला विभाग प्रमुख रेश्मा गावकर सकपाळ, कुणाल प्रभुणे, सानिया लोकाधिकार सेनेचे पदाधिकारी देवेंद्र कदम, संतोष बामणे आणि सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने कामगारांना मिळवून दिले समान काम समान वेतन,
सचिव प्रकाश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई प्रतिनिधी आमदार भाई जगताप यांच्या भारतीय कामगार कर्मचारी महासंघ नेतृत्व करत असलेल्या आस्थापनापैकी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. (MSEDCL) रायगड विभागातील गोरेगाव व रोहा युनीटमधील कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे ‘समान काम समान वेतन’ देण्यात यावे यासाठी भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे सन २०२० मध्ये ठाणे औद्योगिक न्यायालयात दावा क्र.१६/२० व १२/२०१८ दाखल केला होता. औद्योगिक न्यायालय ठाणे यांनी दि. १८ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. लि. गोरेगाव व रोहा युनिट मधील कंलाटी पद्धतीवर वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘समान काम समान वेतन’ देण्यात यावे तसेच त्यांच्या पगारातील तफावत सन २०१६ पासून ते आजतागायत द्यावी असा आदेश पारीत केला होता. या निर्णया विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. लि. (MSEDCL) ने मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन ३१७०/२०२५ व ३१७२/२०२५ अंतर्गत दावा दाखल केला होता.भरती बंदीमुळे नियमित कर्मचाऱ्यांची रिक्त पदे कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून भरून घेत असताना त्यांच्याकडून समान स्वरूपाचे काम करून घेतले जात असेल तर नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीतील किमान वेतन देणे बंधनकारक आहे असा निर्णय मा. उच्च न्यायालयाने दिला. मान्न, वेतन फरकाची थकबाकी काम सुरू झाल्यापासून नव्हे, तर औद्योगिक न्यायाधिकरणाकडे संदर्भ दाखल झाल्याच्या तारखेपासूनच मिळेल, असे स्पष्ट करत न्यायालयाने औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवत मुंबई उच्च न्यायालयाचे मा. न्यायमुर्ति श्री. संदीप व्ही. मारणे यांनी महावितरण व भारतीय कामगार कर्मचारी महासंघ यांच्या याचिकांवर हा निर्णय दिला. भा.का.क. महासंघाचे सचिव प्रकाश शिंदे व कायदेतज्ञ जी. आर. नाईक, के. टी. विश्वनाथन, महासंघाचे कायदेविषयक सल्लागार अॅड. जी. एस. बज साहेब व महासंघाची कोर्ट ब्रिगेड यांचे कामगारांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. हा निर्णय देताना न्यायालयाने नमूद केले की, महावितरणने स्वतःच भरती बंदीमुळे मनुष्यबळाची कमतरता असल्याने कंत्राटी कामगार नियुक्त केल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे हे कर्मचारी नियमित कर्मचाऱ्यांचीच कामे करत असल्याचे स्पष्ट होते. औद्योगिक न्यायाधिकरणाने नोंदविलेला हा निष्कर्ष चुकीचा असल्याचे दाखवण्यात महावितरण अपयशी ठरले. न्यायालयाने या प्रकरणात महाराष्ट्र कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) नियम, १९७१ मधील नियमावर विशेष भर दिला. या नियमानुसार कंत्राटी कामगार नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच काम करत असतील तर त्यांना त्याच दराने वेतन देणे ही वैधानिक जबाबदारी आहे. त्यामुळे हा अधिकार केवळ ‘समान काम समान वेतन’ या घटनात्मक तत्त्वावर नव्हे तर थेट नियमांमधून मिळतो, असे न्यायालयाने याठिकाणी स्पष्ट केले. हा निर्णय कामगारांच्या बाजूने लागल्याने संपूर्ण कामगार वर्गाने भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे आणि आमदार भाई जगताप यांचे मनापासून आभार मानले.
राणीबागेत ज्येष्ठ नागरिकांची प्रभातफेरी बंद, नागरिकांनी केला निषेध मुंबई प्रतिनिधी : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबाग येथे ज्येष्ठ नागरिकांना सकाळी प्रभातफेरी करण्यास मज्जाव करण्यात आल्याने ज्येष्ठांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या संदर्भात राणीबाग प्रभातफेरी समूहाचे श्री. अशोक भेके आणि मनसे नेते श्री. संजय नाईक, समाजसेवक श्री दिनेश कोलते यांनी उद्यान अधीक्षक श्री. त्रिपाठी यांची भेट घेऊन प्रभातफेरी पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. मात्र ज्येष्ठ नागरिकांप्रती उदासीनता दाखवत त्यांनी ही विनंती फेटाळली. “ज्येष्ठांचा दबाव वाढत आहे” हे कारण देत ते प्रभातफेरी सुरू करण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचा आरोप श्री. भेके यांनी केला. विशेष म्हणजे चौकशी केली असता प्रभातफेरी बंद करण्याचे कोणतेही लेखी आदेश वरून आले नसल्याचे समजते. बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मुद्यावर उद्यान परिसरात आंदोलन केले होते. त्यानंतर त्रिपाठी यांनी चिडून प्रभातफेरी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या विरोधात राणीबाग प्रभातफेरी समूहाच्या वतीने श्री. अशोक भेके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री _श्री. देवेंद्र फडणवीस_ आणि मुंबईच्या महापौर _सौ. ऋतु तावडे_ यांना निवेदन सादर केले आहे. केंद्र सरकारच्या “आझादी का अमृत महोत्सव” आणि “फिट इंडिया” या अभियानाला हरताळ फासण्याचे काम येथे होत आहे, अशी खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. जर त्वरित प्रभातफेरी सुरू न केल्यास ज्येष्ठ नागरिक तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देखील भेके यांनी दिला आहे.
तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात!*
मुंबई (प्रतिनिधी): मालाड खाडीमध्ये जागतिक स्तरावरील ‘द ओशन क्लीनअप’ संस्थेच्या इंटरसेप्टर पायलट प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी भाजपचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी केली. यावेळी त्यांनी स्वतः नदीपात्रात उतरून यंत्रणेची कार्यपद्धती, तरंगता कचरा अडविण्याची क्षमता आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाचा सखोल आढावा घेतला. ‘द ओशन क्लीनअप’ ही जागतिक स्वयंसेवी संस्था महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), Plastic Fischer आणि United Way Mumbai यांच्या सहकार्याने मुंबईमध्ये हा पायलट प्रकल्प राबवत आहे. मालाड आणि ट्रॉम्बे खाडी येथे इंटरसेप्टर तंत्रज्ञानाद्वारे समुद्रात जाणारा प्लास्टिक व इतर तरंगता कचरा नदी-नाल्यांमध्येच अडविण्याचा हा उपक्रम आहे. संस्थेच्या अभ्यासानुसार, मुंबईतून दरवर्षी सुमारे ५० लाख किलो प्लास्टिक अरबी समुद्रात वाहून जाते आणि हा प्रकल्प ते प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. या पायलट प्रकल्पाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रायोगिक टप्प्यात इंटरसेप्टर प्रणालीद्वारे कचरा संकलनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या खर्चात बचत होत असून, मुंबईकरांनी कररूपाने भरलेला जनतेचा पैसा वाचत आहे. पर्यावरण संरक्षणाबरोबरच सार्वजनिक निधीचा कार्यक्षम, जबाबदार आणि पारदर्शक वापर करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. अलीकडेच मुसळधार पावसामुळे आणि भरतीच्या वेळी जुहू किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा वाहून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. नदी-नाल्यांमधून वाहत आलेला हा कचरा अखेरीस समुद्रात जाऊन किनाऱ्यावर परत येतो. त्यामुळे समुद्री पर्यावरणाचे मोठे नुकसान होते, सागरी जीवसृष्टी धोक्यात येते आणि हा कचरा पुन्हा उचलण्यासाठी महापालिकेला मोठा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत नदी-नाल्यांमध्येच कचरा अडविणारी इंटरसेप्टर प्रणाली मुंबईसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यावेळी तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले, “लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सूचना देणे किंवा उद्घाटने करणे पुरेसे नसून, प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाची गुणवत्ता तपासणे आणि जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविणे हीच खरी लोकसेवा आहे. स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक मालाड घडविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.” यावेळी त्यांनी मुंबईकरांना आवाहन करताना सांगितले की, “प्रदूषण रोखणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. नदी, नाले किंवा समुद्रात कचरा फेकू नये. ओला व सुका कचरा याचे योग्य वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी आणि स्वच्छ मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य करावे. नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यासच आपले समुद्र, नद्या आणि किनारे स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवणे शक्य होईल.” अल्पावधीतच मदत का ठिकाना उपक्रम, खेळाची मैदाने, उद्याने, युवक विकास कार्यक्रम, रोजगार मेळावे, पर्यावरण संवर्धन, पावसाळी 24X7 मदत कक्ष तसेच विविध जनहिताच्या उपक्रमांमुळे तेजिंदर सिंग तिवाना यांनी अपेक्षित लोकप्रतिनिधीची भूमिका प्रभावीपणे पार पाडल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. मालाडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाशी समन्वय साधत, पर्यावरण संरक्षण, पारदर्शक कारभार, मुंबईकरांच्या कराच्या पैशाची बचत आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून तेजिंदर सिंग तिवाना यांचे कार्य नागरिकांमध्ये विशेष कौतुकास पात्र ठरत आहे.
विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी
विरोधकांनी महापालिका सभागृहात केला निषेध व्यक्त
मुंबई प्रतिनिधी दिल्ली येथील जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक मारहाणीच्या निषेधार्थ शिवसेना उभाटा, मनसे आणि काँग्रेस यांनी आज सभागृहात विद्यार्थ्यांना न्याय द्या यासाठी सभागृह सुरू होताच निषेध व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक होणाऱ्या वागणुकीबाबत विरोधकांनी सभागृहामध्ये देखील मोठ्या आवाजात निषेध केला. यामध्ये त्यांनी चौकीदार चोर आहे, नरेंद्र मोदी हाय हाय या घोषणांनी महापोलीचे तेवढे यांना देखील प्रश्न विचारले. त्यावर महापौर रितू तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी सक्षम आहे असे प्रत्युत्तर दिले. त्यावर सभागृहात एकच गोंधळ उडाला. परंतु महापौर रितू तावडे यांनीसभागृहाचे कामकाज सुरूच ठेवले. या आंदोलनामध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे नगरसेवक निशिकांत शिंदे, किरण तावडे, राजोल पाटील, विरोधी पक्ष नेत्या किशोरी नपेडणेकर, मनसे आणि काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी
विरोधकांनी महापालिका सभागृहात केला निषेध व्यक्त
केतन खेडेकर दिल्ली येथील जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक मारहाणीच्या निषेधार्थ शिवसेना उभाटा, मनसे आणि काँग्रेस यांनी आज सभागृहात विद्यार्थ्यांना न्याय द्या यासाठी सभागृह सुरू होताच निषेध व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक होणाऱ्या वागणुकीबाबत विरोधकांनी सभागृहामध्ये देखील मोठ्या आवाजात निषेध केला. यामध्ये त्यांनी चौकीदार चोर आहे, नरेंद्र मोदी हाय हाय या घोषणांनी महापोलीचे तेवढे यांना देखील प्रश्न विचारले. त्यावर महापौर रितू तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी सक्षम आहे असे प्रत्युत्तर दिले. त्यावर सभागृहात एकच गोंधळ उडाला. परंतु महापौर रितू तावडे यांनीसभागृहाचे कामकाज सुरूच ठेवले. या आंदोलनामध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे नगरसेवक निशिकांत शिंदे, किरण तावडे, विरोधी पक्ष नेत्या किशोरी नपेडणेकर, मनसे आणि काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.
महापौर वैद्यकीय मदत निधीसाठी महापौरांना फक्त 25 हजाराचाच अधिकार
मुंबई प्रतिनिधी मुंबईचे महापौर रितू तावडे यांनी आज मुंबई महानगरपालिका मुख्यालय सीएसटी येथे महापौर वैद्यकीय मदत निधी या कक्षाचे लोकार्पण भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये लेक लाडकी मुख्यमंत्र्यांची, काळजी घेऊ तिच्या आरोग्याची या अभियानांतर्गत मुंबईतील महिलांचे ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेद्वारे सन्मान चिन्ह आणि गोल्ड मेडल देऊन महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांना गौरवण्यात आले. महापौर वैद्यकीय सहायता निधी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी हे दोन्ही निधी एकाच रुग्णाला कसे मिळणार. त्याचप्रमाणे जर एखाद्या रुग्णाने महापौर वैद्यकीय सहायता निधीसाठी अर्ज केला तर तोच अर्ज मुख्यमंत्री वैद्यकीय साहेब निधीकडे पाठवला जाणार. मग एकाच रुग्णाला दोन ठिकाणाहून कशी मदत मिळणार हा प्रश्न आता हा वाचून उभा आहे. तसेच आजकाल उपचार पद्धती आणि आजार एवढे मोठ्या प्रमाणात बळकावले आहे की 25000 मध्ये कोणत्याही रुग्णालयामध्ये उपचार मिळत नाही त्यासाठी त्याला किमान दोन लाखाच्या वर उपचाराची गरज असते. महापौर वैद्यकीय मदत निधीद्वारे रुग्ण रुग्णालयात दाखल असला पाहिजे. तसेच त्याचे नातेवाईकांनी येऊन या ठिकाणी महापौर वैद्यकीय सहायता निधी मदतीसाठी अर्ज केला पाहिजे त्यानंतर त्या ठिकाणी जी काही प्रोसिजर आहे ती होऊन नंतर रुग्णाला महापौर वैद्यकीय सह्याद्री निधीमधून धनादेश दिला जाईल अशी माहिती मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी यावेळेस दिली. एखादा रुग्णालय महापौर निधी कार्यालयाकडे वैद्यकीय मदतीसाठी जर अर्ज केला तर त्यानंतर महापौर फक्त 25000 पर्यंतच त्यांना मदत करू शकतात परंतु जर रुग्णाला पंचवीस हजार पेक्षा अधिक वैद्यकीय उपचाराची गरज असल्यास त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीकडे अर्ज करावा अशी माहिती मुंबई महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी दिली.
वयाच्या ७५ व्या वर्षीही मातीसाठी धडपडणाऱ्या एका माऊलीची प्रेरणादायी गाथा: रेशनिंग क्लर्क ते आदर्श शिक्षण महर्षी!
लेखक विजय लिपारे “स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण खरं जीवन ते असतं जे इतरांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी खर्च होतं.” आज वयाच्या ७५ व्या वर्षीही ज्यांच्या डोळ्यांत गावाच्या विकासाची स्वप्नं तरळतात, अशा आसावरी देसाई यांच्या रूपाने या विधानाची प्रचिती पदोपदी येते. २०१० मध्ये शासकीय सेवेतून (रेशनिंग क्लर्क म्हणून) निवृत्त झाल्यानंतर ठाण्यात स्थायिक झालेल्या आसावरीताईंनी जे कर्तृत्व गाजवलं आहे, ते केवळ कौतुकास्पद नसून थक्क करणारे आहे. वयाच्या या टप्प्यावर जिथे अनेकजण विश्रांतीचा विचार करतात, तिथे ताईंनी आपल्या लाडक्या गावासाठी कंबर कसली. मूळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्याच्या असणाऱ्या आसावरीताई, शहरात स्थिरावल्या असल्या तरी त्यांचे मन सतत आपल्या मातीत, आपल्या गावासाठी काहीतरी करण्याच्या ओढीने व्याकुळ होते. एक स्वप्न: जिथे शिक्षणापासून कुठलेही लेकरू वंचित राहणार नाहीगावात शिक्षणाची पुरेशी सोय नसल्याने लहान मुलांना शिक्षणासाठी मैलोन्मैल दूरवर वणवण भटकत जावं लागतं, हे चित्र आसावरीताईंच्या कोमल मनाला सतत टोचायचे. गावात आधीपासूनच पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा होती. पण शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे, या ठाम विश्वासाने देसाई कुटुंबाने एक धाडसी पाऊल पुढे टाकले.वयाच्या उत्तरार्धातही अंगात अफाट ऊर्जा बाळगून त्यांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशातून गावात ५ वी ते ८ वीच्या वर्गांसाठी शाळा उभी केली. आपल्या आई-वडिलांच्या पवित्र स्मरणार्थ या शाळेला ‘भासकर रुक्मिणी शाळा’ असे नाव देण्यात आले. अखंड जिद्द आणि ३७ लाखांचा प्रेरणादायी प्रवास८ वी पर्यंत शाळा सुरू झाली असली, तरी आसावरीताईंचे स्वप्न इथेच कसे थांबणार? आपल्या गावातील मुलांना ९ वी आणि १० वीच्या शिक्षणासाठी तालुक्याला किंवा इतर गावी दूर जावे लागू नये, यासाठी त्यांनी माध्यमिक शाळा पूर्ण करण्याचे ध्येय उराशी बाळगले. वृद्धपकाळ आणि आर्थिक अडचणींचे डोंगर समोर असतानाही त्या खचल्या नाहीत. त्यांनी वृद्ध शरीराला न जुमानता सरकारी दरबारी चकरा मारल्या, अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या बहुमूल्य सहकार्याने शासनाकडून २० लाख रुपयांचे अनुदान मिळवण्यात त्यांना यश आले. परंतु, शाळेची भव्य वास्तू आणि इतर गरजांसाठी हा निधी अपुरा पडत होता. पण हार मानतील त्या आसावरीताई कशाच्या? त्यांनी आपल्या मित्रमंडळी, आप्तेष्ट, कुटुंबीय आणि विविध स्रोतांच्या माध्यमातून आणखी १७ लाख रुपये गोळा केले. अखेर, अहोरात्र मेहनत करून एकूण ३७ लाखांचा निधी उभा केला आणि शाळेत ८ वी ते १० वीचे वर्ग यशस्वीपणे सुरू करून दाखवले! कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘साग्रूल’ शिक्षण संस्थेच्या सहकार्याने उभे राहिलेले हे ज्ञानमंदिर आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरले आहे. अभिमानास्पद यश आणि माणुसकीचा वस्तुपाठआज वयाच्या ७५ व्या वर्षीही जेव्हा त्या ‘भासकर रुक्मिणी शाळा’ पाहतात, जी आज शिक्षणातच नव्हे, तर सांस्कृतिक उपक्रम आणि शिस्तीच्या बाबतीतही संपूर्ण परिसरात अव्वल स्थान पटकावते आहे, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो.आसावरीताईंसारख्या व्यक्तींकडे पाहिल्यावर आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याबद्दलचा विश्वास अजुनच दृढ होतो. वयाच्या ७५ व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असा उत्साह ठेवून, “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही भावना जपणारे आसावरी देसाई यांचे आयुष्य म्हणजे आजच्या पिढीसाठी एक दीपस्तंभ आहे. त्यांच्या या खडतर पण अत्यंत प्रेरणादायी प्रवासाला आमचा त्रिवार मानाचा मुजरा!
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महीला पदाधिका-याला गंभीर धमकी.
मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांकडे तक्रार .
मुंबई १६-(प्रतिनिधी )- महायुती व विशेषतः भाजपविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठविणा-या राष्ट्रवादी महिला काँग्रेस ( शरद पवार) पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस उषाताई चौधरी यांना फेसबुकद्वारे धमकी देणा-या व्यक्तीविरूध्द योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे करण्यात आली आहे दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील यासंदर्भात गंभीर दखल घेण्याची सूचना नागपूरच्या पोलीस उपायुक्तांकडे केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या राष्ट्रवादी महिला काॅग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस व नागपूर शहर उपाध्यक्षा उषाताई चौधरी या महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षा पासुन सामाजिक व राजकिय शैक्षनिक श्रेत्रात मोलाचे कार्य करत आहेत विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती ,पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळवून देण्याबाबत त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृहांची निर्मिती तसेच सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी 43 कोटीचा निधी मिळवून घेणे, महिलाच्या प्रश्नांवर जंतर मंतर येथे कबड्डी पटू खेळाडूं सोबत आंदोलन करने तसेच गेल्या तीन दशका पासून हुंडाबळी महिलासाठी काम करून पीडीत महिलांना न्याय मिळवून देणे आदी विषयांवर त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे . चौधरी या राजकीय पक्षाच्या पदाधिकारी असल्यामुळे महायुती व विशेषतः भाजपच्या चुकीच्या धोरणांवर त्या लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडत असतात.त्यांच्या या आक्रमक भूमिकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रकाश धोतरकर नावाच्या एका ईसमाने सोशल मिडीयाच्या माध्यमातून हिंदीत गर्भित धमकी दिली.तुम पहले अपना घर देखो और संभालो… कल तुम्हारे यहाँ १० लोग नाश्ता और चाय पीने आ रहे है क्या तुम्हे कबूल है, कबूल है, कबूल है…? जवाब देना बहना कब आये १० लोग । अशा प्रकारे जाहीरपणे गंभीर धमकी दिली.यासंदर्भात चौधरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फबणवीस, गृहराज्यमंत्री योगेश कदम , पोलीस महासंचालक सदानंद दाते,तसेच नागपुरातील स्थानिक सोनेगाव पोलीस ठाणे येथे तक्रार देत सबंधित व्यक्तीला अटक करून आपल्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.यासंदर्भात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनीदेखील नागपूर झोन क्रमांक १ चे पोलीस उपायुक्त यांना पत्र दिले आहे.चौधरी यांना जाहीरपणे देण्यात आलेल्या धमकी प्रकरणाची गांभिर्याने दखल घेवून पुढील धोका टाळण्यासाठी सबंधित व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.



