मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रातील खाटीक समाज, मटण व्यापारी तसेच शेळी-मेंढी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांवर होत असलेला छळ, विनाकारण अडवणूक, खोटे गुन्हे दाखल करणे, रस्त्यावर त्रास देणे आणि व्यवसायात अडथळे निर्माण करण्याच्या घटनांबाबत देवनार पशुवधगृह येथे महाव्यस्थापक डॉ.कलीम पाशा यांच्या दालनात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक पार पडली.
यावेळी हाजी अरफात शेख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, समाजावरील अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. व्यापारी, वाहतूकदार, खाटीक समाज तसेच या व्यवसायाशी संबंधित प्रत्येक घटकाच्या न्याय्य हक्कांसाठी राज्य मुस्लिम खाटीक समाज ठामपणे उभा आहे.
या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसमोर मागण्या मांडण्यात आल्या. प्रशासनाने तातडीने कारवाई करून समाजाला न्याय द्यावा, अन्यथा समाजाच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यास आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
हाजी अरफात शेख म्हणाले की, “खाटीक समाज, वाहतूकदार, मटण व्यापारी तसेच या व्यवसायाशी निगडित प्रत्येक व्यक्तीच्या न्यायासाठी जेव्हा जेव्हा गरज भासेल, तेव्हा तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू. विनाकारण छळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला कायद्याच्या चौकटीत उत्तर दिले जाईल. समाजाला न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही.”
बैठकीत उपस्थित व्यापारी व समाजबांधवांनीही एकजुटीने अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आणि शासनाने या गंभीर प्रश्नांची तातडीने दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
या प्रसंगी बैठकीस देवनार पशुवधगृहाचे महाव्यस्थापक डॉ. कलिमपाशा ए. पठाण, संबधित प्रशासकीय अधिकारी, हिंदू खाटीक समाज, मुस्लिम खाटीक समाज, धनगर समाजाचे प्रतिनिधी, पशुधन वाहतूकदार, व्यापारी, विविध सामाजिक समाजबांधव तसेच राज्य मुस्लिम खाटीक समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






